तुकडोजी महाराज परिचय

तुकडोजी महाराज 
तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे आहे. त्यांचा जन्म एप्रिल २७, १९०९ तालुका यावली, जि. अमरावती येथे झाला व निर्वाण ऑक्टोबर ११, १९६८ झाला . त्यांचे आई मंजुळाबाई व वडील बंडोजी व गुरू आडकोजी महाराज होते . अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. “आते है नाथ हमारे” हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
आपली वाणी आणि लेखणी, शक्ती आणि भक्ती यांचे सर्व सामर्थ्य एकवटून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामाजिक जागृतीचे आणि प्रगतीचे प्रयत्न सातत्याने केले. आपल्या देशातील झोपी गेलेली खेडी जागी व्हावीत, अज्ञान, लोकभ्रम आणि सामाजिक निष्क्रियता यांमुळे ग्रामीण जीवनाची झालेली दुर्दशा नाहीशी व्हावी, तिथल्या समाजाची सुधारणा व्हावी व सुखी जीवनाच्या दृष्टीने वाटचाल व्हावी, ग्रामस्थांच्या आयुष्यात चैतन्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी कार्य केले. सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने भाग्यशाली असलेला हा देश शिक्षण, आरोग्य आणि धनधान्य याही बाबतीत तितकाच वैभवशाली का नाही या विचाराने संत तुकडोजी महाराजांचे मन सदैव तळमळत असे.
लहानपणापासूनच भजन आणि कीर्तनाकडे कल असलेल्या माणिकला त्या आशीर्वादांचं पाठबळ लाभलं आणि त्याच्यामध्ये एक सुप्त परिवर्तन होऊ लागलं. त्यांच्या घराण्याचं दैवत विठ्ठलच. याच विठूरायानं ज्ञानेश्वरांपासून ते तुकारामांपर्यंत सर्वांना जीवनाचा वेगळा मार्ग दाखवला. भरपूर मुलंबाळं होणं आणि पोटाला दोनवेळचं पुरेसं मिळवणं यातच संसाराची इतिकर्तव्यता मानणा-या समाजात त्यापलीकडंच एक अद्भुत जग या विठूरायानं दाखविलं. ज्ञानेश्वर-तुकाराम , एकनाथ-नामदेव यांच्यामार्फत ते सामान्यांच्या घरामध्ये अवतरलं आणि महाराष्ट्रात चमत्कार झाला. भागवतधर्माचा गजर सगळीकडं होऊ लागला. भावभक्तीला महापूर आला. अर्थात या संतांच्या वेळचा काळ निराळा होता. माणिक ज्या काळामध्ये मोठा होत होता , ते दिवस अगदीच वेगळे होते. पारतंत्र्याच्या जोखडाखाली देश पिचून गेला होता. सामान्यांच्या डोळ्यातंली स्वप्नं विझून गेली होती. स्वत्वाचा विसर पडलेला होता. हे माणिक यांच्या नजरेला पडत होते. ते अस्वस्थ होत होते.
अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती. त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले.
सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली.महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.