या झोपडीत माझ्या

या झोपडीत माझ्या
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥
भूमीवरी पडावे, तार्‍यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥
पहारे आणि तिजोर्‍या, त्यातूनी होती चोर्‍या
दारास नाही दोर्‍या, या झोपडीत माझ्या॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन, हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म 
परिषदेत म्हटले होते, हे भजन दिल्ली येथील राजघाटा वर नियमीत ऐकविले जाते.